विवा कॉलेजमधील विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; बाबा घरात असताना गॅलरीतून मारली उडी
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – विरारमधील विवा कॉलेजमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रिचा पाटील (१९) असं मृत तरुणीचं नाव आहे. रिचा पाटील ही विवा कॉलेजमध्ये बीकॉम डिग्रीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रिचा पाटील हिला धमकी दिली जात होती. तिच्याच कॉलेजमधील काही तरुण तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होते. या प्रकरणात आरोपी मुलं आणि रिचाला कॉलेजमध्ये बोलावण्यातंही आलं होते. शाळा व्यवस्थापनाने समज देऊन दोघांनाही घरी जाण्यास सांगितलं होतं. मात्र कॉलेजच्या इमारतीच्या खाली येताच आरोपी तरुण रिचाला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, असा दावा रिचाच्या वडिलांनी केला आहे. यावेळी त्याने रिचा पाटील हिच्या आई-वडिलांसाठीही अपशब्द वापरले होते. यानंतर रिचा वडिलांसोबत घरी आली. घरात असताना रिचाने गॅलरीतून उडी मारून आपलं जीवन संपवलं असं सांगितलं जात आहे.
यानंतर रिचाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान रिचाचा मृत्यू झाला. रिचाचे फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं सांगितलं जात असून आरोपीने दिलेल्या धमकीमुळे रिचाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चार मुलं आणि एका मुली विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.