रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे संतप्त नागरिक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून खड्डेयुक्त रस्त्याला केडीएमसी आयुक्तांचे नाव

Spread the love

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे संतप्त नागरिक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून खड्डेयुक्त रस्त्याला केडीएमसी आयुक्तांचे नाव

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याण पूर्वमधील नागरिक आणि वाहनचालकांसाठी एक मोठी समस्या डोकेदुखी बनली आहे. एमआयडीसाला जोडणाऱ्या श्रीकृष्ण नगर ते पत्री पूल ते नवी गोविंद वाडी या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र लहान-मोठे खड्डे पडले असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी नागरिक अत्यंत हैराण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे संतप्त नागरिक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यालाच केडीएमसी आयुक्तांचे नाव दिले आहे.

या परिसरात चार शाळा असल्याने, दररोज शेकडो विद्यार्थी आणि पालक याच रस्त्याचा वापर करतात. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण येते. तर पालकांना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. वारंवार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला तक्रार करूनही, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान यांनी या समस्येविरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान, शकील खान आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये चक्क झाडे लावली, जेणेकरून प्रशासनाचे लक्ष वेधता येईल.

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलले. त्यांनी या खड्डेमय रस्त्याला थेट केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचे नाव दिले. रस्त्यावर लावलेल्या बोर्डवर ‘अभिनव गोयल रोड’ असे लिहून त्यांनी प्रशासनाचा प्रतिकात्मक निषेध केला. आता तरी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनातून नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरच रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon