डी कंपनी, नाना कंपनीनंतर ‘अरविंद सोढा कंपनी’ची दहशत; चेंबूर परिसरात हफ्तेखोरी पुन्हा सक्रिय!
विशेष प्रतिनिधी / मुंबई
चेंबूर : मुंबईच्या अंडरवर्ल्ड इतिहासात डी कंपनी, नाना कंपनी आणि डॅडी कंपनीनंतर आता ‘अरविंद सोढा कंपनी’ या नावाने नवीन दहशत निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. चेंबूर आणि टिळक नगर परिसरात या टोळीचे गुंड पुन्हा सक्रिय झाले असून स्थानिक व्यापाऱ्यांकडून धमकी देत खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू झाल्याचे उघड झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सोढा हा मुंबईतील कुख्यात गुंड असून काही दिवसांपूर्वी तो मकोका (MCOCA) अंतर्गत ठाणे कारागृहातून सुटला आहे. सुटकेनंतर तो सध्या नवी मुंबईतील नेरुळ परिसरात वास्तव्यास आहे. तथापि, त्याचे साथीदार आणि गुर्गे चेंबूर व टिळक नगर परिसरात पुन्हा सक्रीय झाले आहेत.
स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोढाच्या नावाने काही गुंड पी.एल. लोखंडे मार्ग, कादरिया नगर, साई इंडस्ट्रीज आणि नागवाडी परिसरात फिरत व्यापाऱ्यांना धमकावत आहेत. “सोढा कंपनीकडून हप्ता देणेच बरे” असा इशारा देऊन या गुंडांनी व्यापार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, या टोळीतील काही महिला सदस्यही सक्रिय असून त्या गुन्हेगारी व्यवहारात दुवा साधण्याचे काम करतात. दरमहा या महिलांना टोळीच्या वतीने मोबदला दिला जातो, अशीही माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखा युनिट ६ आणि टिळक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, “अरविंद सोढाच्या प्रत्येक साथीदारावर आमची नजर आहे. त्यांनी काही गैरकृत्य केल्यास त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.”
दरम्यान, स्थानिक व्यापारी वर्गामध्ये वाढत्या हफ्तेखोरीमुळे भीतीचे वातावरण असून, पोलिस प्रशासनाकडून या गुंडांविरोधात तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.