जय अंबेनगरमध्ये प्राकृतिक तलावाची भरणी करून अवैध बांधकाम सुरू!
रवि निषाद / वार्ताहर
मुंबई – चेंबूरमधील एम-पश्चिम विभागातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेल्या जय अंबेनगर परिसरात सात दशकांपूर्वीचा प्राकृतिक तलाव भरून अवैध बांधकाम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या तलावाचे अस्तित्व अनेक वर्षांपासून होते. मात्र, अलीकडच्या काळात काही झोपडामाफियांनी तलावाची भरणी करून त्या ठिकाणी बेकायदेशीर झोपड्या उभारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ही बांधकामे संगम लॉजिंगच्या मागील बाजूस सुरू असून, सर्वकाही उघडपणे सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या अवैध कारवाईमागे दिवाकर प्रजापती नावाचा व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. प्रजापती हा परिसरातील झोपडामाफियांचा प्रमुख असून, त्याच्याकडे बाहेरील कामगारांना आणून तलाव भरून बांधकामाचे काम करवून घेतल्याचे सांगितले जाते.
स्थानिक सूत्रांनी सांगितले की, दिवाकर प्रजापती हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचे काही मनपा अधिकारी, पोलिस व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी सख्य असल्याने त्याच्याविरुद्ध कोणीही कारवाई करण्यास पुढे येत नाही. टिळक नगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “दिवाकर हा अत्यंत चलाख आणि प्रभावशाली माणूस आहे. त्याच्याविरोधात कारवाई करण्यास अधिकारी घाबरतात.”
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिवाकर प्रजापती आणि त्याच्या साथीदारांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर केवळ नोटीस देऊन प्रकरण दडपल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी मनपा व पोलिस प्रशासनाला तात्काळ हस्तक्षेप करून तलाव भरणी थांबविण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.