विदेशी दारू तस्करी फसली; ₹२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अधीक्षक प्रवीण तांबे यांची धडक कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – राज्यात दारूच्या किंमतींमध्ये झालेल्या वाढीनंतर महाराष्ट्रात विदेशी दारूची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. दादरा नगर हवेली, दमण-दिव तसेच इतर परराज्यातून कर चुकवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
या गुप्त माहितीनुसार कल्याणच्या भरारी पथकाने शहापूर तालुक्यातील विहिगाव-खोडाळा रोड परिसरात सापळा रचून एक मोठी कारवाई केली. या कारवाईत पथकाने २०० बॉक्स विदेशी दारूचा साठा आणि एक पिकअप टेम्पो असा मिळून एकूण ₹२३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात हे स्पष्ट झाले की, ही दारू दादरा नगर हवेली – दिव – दमण या परराज्यांतून कर चुकवून महाराष्ट्रात आणली जात होती. या कारवाईमुळे दारू तस्करांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. निरीक्षक परब यांच्या पथकाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, या तस्करीमागील मूळ सूत्रधारांचा शोध सुरू आहे.