कुर्ल्यातील फौजिया हॉस्पीटलच्या बोगस डॉक्टरांवर गंभीर आरोप
रवि निषाद / मुंबई
मुंबई – कुर्ला परिसरातील फौजिया हॉस्पिटल गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस व एमडी नसलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे ट्रान्सपोर्ट सेल प्रमुख हाजी अरफात शेख यांनी केला आहे.
शेख यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. प्रकाश आबिटकर यांना निवेदन देत तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हॉस्पिटलमध्ये ICU/NICU, ऑपरेशन थिएटर आणि डायलिसिस युनिट यांसारखे गंभीर विभाग चालवले जात आहेत, परंतु यासाठी कोणतीही अधिकृत परवानगीच घेण्यात आलेली नाही. तरीदेखील रुग्णांवर उपचार सुरू असून, हे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी अनेक तक्रारी असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेख यांनी थेट फौजिया हॉस्पिटलचे नोंदणी रद्द करून संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.