मानखुर्दमध्ये वीज वादातून युवकाची हत्या; पोलिसांनी ९ आरोपींना केली अटक, एक फरार
रवि निषाद / मुंबई
मुंबई – मानखुर्द परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. वीज जोडणीच्या कारणावरून झालेल्या भांडणात २६ वर्षीय राजू शेख या युवकाची हत्या झाली असून इदु नावाचा दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबाकडे भाडेकरूंनी त्यांच्या वीज बॉक्समधून वायर जोडून देण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावरून वाद वाढला आणि तो हाणामारीपर्यंत गेला. त्यात राजू शेखचा मृत्यू झाला, तर इदु नावाचा युवक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त समीर शेख यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त वाढवली आहे.