धाडसी टीसीने अपहरणातून बाळाला वाचवले; कोकण रेल्वेकडून सन्मान आणि पारितोषिक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – कोकण रेल्वेच्या सतर्क टीसीच्या धाडसी निर्णयामुळे एका दोन वर्षांच्या बाळाचे अपहरण टळले आहे. दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर टीसी संदेश चव्हाण यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवले आहे.
२७ सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी या गाडीत टीसी संदेश चव्हाण यांना एक व्यक्ती एका लहान मुलासह संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसला. त्याचे मुलाशी असलेले वर्तन आणि दिलेली उडवाउडवीची उत्तरे पाहून चव्हाण यांना संशय आला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या व्यक्तीला रोखले आणि तत्काळ नियंत्रण कक्ष तसेच ठाणे रेल्वे पोलिसांना कळवले.
सदर व्यक्ती अमोल अनंत उदलकर (४२) हा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हे मूल मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणल्याची कबुली दिली. अपहरण झालेल्या मुलाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय २) असून, आईच्या उपचारादरम्यान आजीकडे असताना आरोपीने त्याला पळवले होते. पोलिसांनी तत्काळ मुलाला सुरक्षितरित्या आईच्या ताब्यात दिले.
टीसी संदेश चव्हाण यांच्या दक्षतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला. त्यांच्या धाडसी कामगिरीची दखल घेऊन कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांना पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चव्हाण यांनी दाखवलेली जागरूकता प्रेरणादायी आहे,” असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.