विवाहाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून महिलेशी अत्याचार; मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – विवाहाचे आमिष दाखवून एका ५२ वर्षीय अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी डॉक्टर अंबरनाथमधील रहिवासी असून मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात ते कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांचा तिच्या कुटुंबाशी संपर्क वाढला. या निमित्ताने डॉक्टर पीडितेच्या घरी येत असत आणि तिच्या मुलाला शैक्षणिक मार्गदर्शन करीत असत. या दरम्यान डॉक्टरांनी पीडितेला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दहा महिन्यांच्या काळात डॉक्टर नियमितपणे तिच्या घरी जाऊन संबंध ठेवत होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डॉक्टरांनी “पत्नीशी आपले पटत नाही, लवकरच घटस्फोट घेऊन आपण लग्न करू,” असे सांगून पीडितेचा विश्वास संपादन केला. एवढेच नव्हे तर मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचे आश्वासनही दिले. मात्र फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपीच्या पत्नीने थेट पीडितेशी संपर्क साधून सत्य बाहेर आणले. त्यानंतर डॉक्टरांनी फोनवरच “माझी चूक झाली, मी तुला भेटणार नाही, लग्न करणार नाही” असे सांगून नातेसंबंध तोडले.
या घटनेनंतर मानसिक धक्क्याने पीडिता आजारी पडली आणि तिने उपचार घेतले. त्यातून बाहेर पडल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. सध्या मानपाडा पोलीस ठाण्यात या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
विवाहाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.