मिरा रोडमध्ये गरबा खेळणाऱ्यांवर अंडंफेक; पोलिसांच्या उपस्थितीत राडा, नागरिक संतप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा रोड : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत आयोजित सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान अंडं फेकल्याच्या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी एस्टेला बिल्डिंगमधील एका रहिवाशाविरोधात बी.एन.एस. २०२३ कलम ३०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास गरबा सुरु असताना संबंधित व्यक्तीने प्रथम कार्यक्रमाचा डेसिबल लेव्हल तपासला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून पोलिसांना दाखवला. काही वेळातच सोसायटीच्या १६व्या मजल्यावरून अंडं खाली फेकल्याचा आरोप नागरिकांनी केला. विशेष म्हणजे अंडं फुटलेले दोन कवच थेट महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ आढळल्याने संतापाची लाट उसळली.
रहिवाशांनी या प्रकारामागे संबंधित व्यक्तीच असल्याचा संशय व्यक्त केला असून त्याच्या विरोधात शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे व हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. अखेर नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी धार्मिक उपासना सुरू असताना जमावास व्यत्यय आणल्याच्या गुन्ह्याची नोंद केली.
सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नसून, पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सकाळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या व्यक्तीचे यापूर्वीही काही वादग्रस्त प्रकारात नाव आल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे म्हणाले,
“नवरात्रोत्सवाच्या काळात इतका निंदनीय प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला. आम्ही पोलिसांना स्पष्ट सांगितले की कारवाई झाल्याशिवाय आम्ही हालणार नाही. नागरिकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे.” पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.