विद्यार्थ्यांवर टिळा-टिकली, बांगड्या व धाग्यांवर बंदी; के.सी.गांधी शाळेचा अजब फतवा
शाळा प्रशासनाविरोधात पालकांचा संताप, शाळेला मनपाची नोटीस
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कल्याणमधील के. सी. गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या टिळा-टिकली, बांगड्या व राखीसह धागा बांधण्यावर घातलेल्या बंदीमुळे वाद निर्माण झाला आहे. शाळेच्या या निर्णयामुळे पालक संतप्त झाले असून शिक्षण विभागाने शाळेकडून तातडीने खुलासा मागवला आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, कपाळावर टिळा अथवा टिकली लावून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा टिळा जबरदस्तीने पुसण्यात येतो. इतकेच नाही तर काही विद्यार्थ्यांना यासाठी मारहाण केल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. “टिळा किंवा टिकली लावल्यास शिक्षा केली जाईल,” अशा धमक्या विद्यार्थ्यांना दिल्या गेल्याचंही पालकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणावर संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता, “शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, गंध, बांगड्या व राखी घालण्यास मनाई करण्यात आली आहे,” अशी स्पष्टोक्ती शाळा प्रशासनाकडून करण्यात आली.
या वादग्रस्त निर्णयाविरोधात पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत शाळेला नोटीस बजावली असून संपूर्ण प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे के. सी. गांधी स्कूल प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली असून पालक व शिक्षण विभागाचा पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.