गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली धडक, ३ जण गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – लाखो तरुणांच्या हद्रयावर राज्य करणारी डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह २ जण जखमी झाले आहे. सुदैवाने, ज्यावेळी अपघात घडला तेव्हा गौतमीही कारमध्ये नव्हती. गौतमीच्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गौतमी पाटील हिच्या कारला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या कारचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला.
या हॉटेलसमोर रिक्षाचालक उभा होता. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या गौतमी पाटील हिच्या गाडीने रिक्षाला जोराची पाठीमागून धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होती की, रिक्षा काही अंतरापर्यंत ढकलला गेला. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. चालकाने गौतमी पाटील हिची कार असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.