“चेंबूरकरांनो सांभाळा! अरविंद सोढा बाहेर… हफ्तेखोरीचा महापूर”
मुंबई – चेंबूर टिळकनगरमध्ये पुन्हा गुन्हेगारीचे सावट! कुख्यात झोपडी माफिया अरविंद सोढा ठाणे कारागृहातून बाहेर पडताच परिसरात धिंगाणा सुरू झाला आहे. काही दिवसांतच व्यापाऱ्यांच्या अंगावर ‘सोढा परतलाय’ असा काटा उभा राहिला आहे.
हफ्तेखोर टोळी पुन्हा सक्रिय:
पी.एल. लोखंडे रोडपासून नागवाडी, कादरिया नगर, साई इंडस्ट्रीज या भागात सोढाचे अंगरक्षक आणि साथीदार धमक्या देऊन उघडपणे वसुली करत आहेत. छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या शॉपमालकांपर्यंत – सगळ्यांच्या खिशावर या गँगची नजर आहे.
झोपड्यांपासून खंडणीपर्यंतचा प्रवास:
सुरुवातीला झोपडपट्टीत शाल्टपेन बळकावून झोपड्या विकणारा हा गुंड, आज व्यापाऱ्यांच्या जिवाशी खेळतोय. त्याच्या टोळीतील ३-४ महिला साथीदारांनाही दरमहा ‘पगार’ मिळतो आणि त्या हफ्तेखोरीत आघाडीवर आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांकडे आहे.
पोलिसांचा डोळा:
टिळक नगर पोलीस, पोलीस उपायुक्त स्कॉड आणि क्राईम ब्रांच युनिट ६चे अधिकारी सतर्क झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, “सोढाच्या नावाखाली कोणालाही दहशत माजवू देणार नाही. तक्रार आली तर कारवाईत विलंब होणार नाही.”
व्यापाऱ्यांची हळहळ:
“८०-९० च्या दशकात डी कंपनी-नाना कंपनीची दहशत होती, आज अरविंद सोढा त्याच पद्धतीने वागत आहे. आता पुन्हा तो काळ आलाय,” असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चेंबूरकरांच्या गल्लीबोळांत आता फक्त एकच चर्चा, “सोढा बाहेर आलाय… सावध राहा!”