डोंबिवलीत प्रेयसीसोबतच्या वादातून तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – प्रेयसीसोबत झालेल्या वादातून संतप्त झालेल्या एका २२ वर्षीय तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात घडली. ऋषिकेश परब असे मृत तरुणाचे नाव असून, तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.
सुदामा इमारतीत सहाव्या मजल्यावर ऋषिकेश आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीशी त्याची ओळख झाली होती. ही ओळख हळूहळू प्रेमसंबंधात परिवर्तित झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे संबंध सुरळीत होते; मात्र अलीकडे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
शनिवारी सकाळी ऋषिकेशचा प्रेयसीसोबत वाद झाला. संतप्त अवस्थेत त्याने मोबाईल घरात फेकून दिला आणि थेट इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेला. तेथे डक्ट भागात उभा राहून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून रहिवाशांनी आणि नागरिकांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती विष्णुनगर पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाचे जवानही बचावासाठी दाखल झाले.
मात्र, समजावूनही ऋषिकेश ऐकण्यास तयार नव्हता. अचानक त्याने सज्ज्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने पालिका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी व्यक्त केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.