राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात; ३० जानेवारीपर्यंत पूर्ण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर हिरवा कंदील मिळाला असून या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, ३० जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक ठरवण्यात आला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
८ ऑक्टोबर २०२५ : विभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर
१४ ऑक्टोबर २०२५ : हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम मुदत
२७ ऑक्टोबर २०२५ : अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध
यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोव्हेंबरपासूनच निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून डिसेंबर-जानेवारीत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणखी मुदतवाढ न देण्याची स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आयोगावर निवडणुका वेळेत पार पाडण्याचा मोठा दबाव आहे.