कल्याण गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : शिकलकर टोळीच्या ४ जणांना अटक, ३९.५३ लाखांचा ऐवज जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – ठाणे व नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत घरफोडीच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले असताना, कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पथकाने मोठी कारवाई करून कुख्यात शिकलकर टोळीचे ४ सदस्यांना अटक केली आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व घरफोडीसाठी वापरलेली टोयोटा इनोव्हा गाडी मिळून तब्बल ३९ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींची नावे
१. विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (२४), रा. हडपसर, पुणे
२. सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (२७), रा. हडपसर, पुणे
३. सन्नी करतारसिंग सरदार (२७), रा. आंबिवली, कल्याण
४. अतुल सुरेश खंडाळे (२४), रा. हडपसर, पुणे
या चौघांनी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध हद्दीत ४० हून अधिक घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्यांचा तपास
गुन्हे शाखा, घटक-३ कल्याणच्या पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या पाळतीच्या आधारे टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्या कबुलीजबाबातून डोंबिवली, विठ्ठलवाडी, कोळशेवाडी, कळवा, मुंब्रा, बदलापूरसह ठाणे व नवी मुंबईतील ४० घरफोडी प्रकरणे उघडकीस आली.
टोळीचा जुना गुन्हेगारी इतिहास
अटकेतील आरोपींवर यापूर्वीही पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, नवी मुंबई, जळगावसह राज्यातील विविध ठिकाणी घरफोडी, चोरी, दरोडे व मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि किरण भिसे, विनोद पाटील यांच्यासह २५ हून अधिक अंमलदारांनी ही मोहीम यशस्वी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ठाणे व नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेले घरफोडीचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.