एका क्लिकवर ठाणे पोलिसांची सेवा; ‘ठाणे पोलीस चॅटबोट’ची सुरूवात
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलिसांच्या सेवा आता नागरिकांना घरबसल्या, एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे पोलीस चॅटबोट’ या अभिनव व्हॉट्सअॅप सेवेची सुरूवात करण्यात आली आहे.
घरबसल्या उपलब्ध सुविधा
या चॅटबोटच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलवरूनच विविध सुविधा मिळतील. त्यामध्ये ऑनलाईन तक्रार नोंदणी, आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलन पेमेंट, सायबर गुन्ह्यांची माहिती, हरवलेल्या वस्तूंची तक्रार, भाडेकरू नोंदणी, पोलीस स्टेशनची माहिती, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, संशयास्पद बाबींबाबत माहिती देणे, नवीन कायदे, आपले सरकार सेवा व सुरक्षा टिप्स या सेवा समाविष्ट आहेत.
अभिप्राय देण्याचीही सोय
याशिवाय, नागरिकांना आपला अभिप्राय (Feedback) थेट चॅटबोटवर नोंदवता येणार आहे. यामुळे सेवा सुधारण्यात मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
नागरिकाभिमुख उपक्रम
जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी सांगितले की, “ठाणे पोलीस चॅटबोटमुळे सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तातडीने उपलब्ध होतील. पत्रकार बांधवांनी या सेवेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन करण्यात आले आहे.
संवाद अधिक सशक्त
या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त होणार असून, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी व लोकसहभाग वाढण्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.