शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखावर मंत्रालयीन नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा गुन्हा
पालघर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेतील युवासेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा याच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयात क्लार्कची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत त्याने तरुणांकडून लाखो रुपयांची उकळ केली असल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आप्पाने मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका फिर्यादीकडून दोन लाख वीस हजार रुपये घेतले. यासंदर्भात फिर्यादीने आरोपी सौरभ आणि शिंदे यांचे खासगी सचिव काळे यांच्यातील व्हाट्सअप संभाषणाचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे सादर केले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत सौरभ आप्पाने ५० पेक्षा जास्त तरुणांना अशाच प्रकारे नोकरीच्या आमिषाने फसविल्याचा गंभीर आरोप आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पालघर पोलिसांकडून सुरू असून, या संदर्भात कोणतीही अतिरिक्त कारवाई केली जाईल, अशी माहिती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली आहे.