ठाण्यात अवैध विदेशी दारूचा मोठा साठा जप्त; दोन आरोपी अटक, २ कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाण्यात मोठी कारवाई करत अवैध विदेशी मद्याची तस्करी करणारा ट्रक पकडला. मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या आदेशानुसार व मा. प्रसाद सुर्वे (सहआयुक्त, अंमलबजावणी व दारूबंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. प्रदीप पवार (विभागीय उपआयुक्त, कोकण विभाग, ठाणे) यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, कोकण विभाग, ठाणे यांनी खात्रीलायक माहितीवरून तळोजा रूफिंग इंडस्ट्रीज समोर, सदुद्दीन इस्टेट, मुंब्रा–पनवेल रोड, भंडार्ली, ठाणे येथे सापळा लावून तपासणी केली. त्यावेळी अशोक लेलँड बाराचाकी ट्रक (क्रमांक आरजे ५२ जीए ३७६२) मधून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारूचा साठा आढळून आला.
सदर ट्रकमध्ये मिळालेला मुद्देमाल :
एवरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की (७५० मिली) – ७६० बॉक्स (गोव्यात विक्रीस बंदी असलेले)
स्टॅंडर्ड रिझर्व्ह हिपी व्हिस्की (१८० मिली) – ७२० बॉक्स (फॉर एक्सपोर्ट ओन्ली)
रीटझ रिजर्व ग्रेन व्हिस्की (१८० मिली) – ८० बॉक्स (फॉर एक्सपोर्ट ओन्ली)
एकूण १५६० बॉक्स (१३,७५२ बल्क लिटर) विदेशी दारू, जप्त ट्रक, तीन मोबाईल फोन असा एकत्रित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे ₹२,२२,६९,०००/- एवढी आहे.
या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५(अ)(इ), ८०, ८१, ८३, ९०, १०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.