रुग्णालयात तरुणीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – हडको परिसरातील एम्स रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ इंजेक्शन आढळून आल्याने तिच्या मृत्यूचे रहस्य अधिक गहिरे झाले आहे. याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. मृत तरुणीचं नाव हर्षदा पद्माकर तायडे (२५) असं आहे. हर्षदा विसरवाडी भागात कुटुंबासह वास्तव्यास होती. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून अडीच महिन्यांपूर्वीच ती हडको येथील एम्स रुग्णालयात नोकरीस लागली होती. रविवारी सकाळी हर्षदा कामावर हजर झाली होती. मात्र, बराच वेळ ती दिसून न आल्याने सहकाऱ्यांनी तिला कॉल केला. त्यावेळी तिने “मी स्वच्छतागृहात आहे” असं सांगितलं. नंतरही ती परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहात पाहिले असता, हर्षदा बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली.
तिच्या शेजारी इंजेक्शन सापडले तर हातावर इंजेक्शनचे व्रण होते. तिला तात्काळ घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निवृत्ती गायके व सहाय्यक फौजदार राठोड यांनी भेट दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दुपारी हर्षदाच्या भावाने तिच्या मोबाईलवर कॉल केला असता, सहकाऱ्यांनी फोन उचलून “डोक्याला मार लागला आहे” अशी माहिती दिली होती. मात्र रुग्णालयात आल्यानंतर वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचा आरोप भावाने केला. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून “हर्षदाने इंजेक्शन घेतल्यामुळे मृत्यू झाला” अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तरीसुद्धा तिच्या मृत्यूमागील खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.