अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या रिपाई कार्यकर्त्यावरच खंडणीचा गुन्हा; ठेकेदार-पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप
मुंबई : चेंबूर (एम-पश्चिम विभाग) हद्दीतील ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. घर दुरुस्तीच्या नावाखाली ३ ते ४ मजली धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणावर उभारल्या जात असून काही बांधकामे थेट टाटा पॉवरच्या अति उच्च दाबाच्या तारांखाली होत आहेत. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून भविष्यात भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनधिकृत बांधकामांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष विजय निकम यांनी मनपा एम-पश्चिम विभाग कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली. मात्र, या तक्रारीनंतर अनधिकृत बांधकामांमधून लाखोंचा फायदा मिळवणाऱ्या ठेकेदार व संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे तक्रारदारच अडचणीत सापडला. नेहरू नगर पोलीस ठाण्यात विजय निकम यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जेलची हवा खावी लागली आहे.
पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची “अर्थपूर्ण घट्ट मैत्री” यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप रिपाई कार्यकर्त्यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याऐवजी तक्रारदारालाच खंडणीखोर ठरविण्याच्या कारवाईमुळे ठेकेदारांचे बळ अधिक वाढल्याची चर्चा स्थानिकांत आहे. ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरातील या जीवघेण्या बांधकामांविरोधात ठोस पावले उचलण्यासाठी रिपाई पक्षाचे एक शिष्टमंडळ लवकरच मनपा उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर व पोलीस उपायुक्त श्री. समीर शेख यांची भेट घेणार असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक नागरिकांचा सवाल : “तक्रारदारच गुन्हेगार ठरला, मग जबाबदार ठेकेदार व पालिका अभियंते मात्र मोकळेच का?”