सांगलीत ‘स्पेशल २६’ स्टाईल लूट; तोतया आयटी अधिकाऱ्यांकडून २ कोटींचा बोगस छापा
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – बॉलिवूडच्या स्पेशल २६ चित्रपटासारखा थरारक प्रकार सांगली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कवठेमहांकाळ येथे तोतया आयकर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या घरावर खोटा छापा टाकून तब्बल २ कोटींचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात चार जणांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत सर्च वॉरंट दाखवून प्रवेश केला. सिनेस्टाईल पद्धतीने झडती घेत त्यांनी घरातील १६ लाखांची रोकड व जवळपास एक किलो सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे २ कोटींचा ऐवज ‘जप्त’ केला आणि तेथून पोबारा केला.
त्यानंतर संशय आल्याने डॉक्टर म्हेत्रे यांनी तात्काळ कवठेमहांकाळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर हा संपूर्ण छापा बोगस असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात तोतया आयकर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या सिनेस्टाईल लुटीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.