नालासोपारा पोलिसांचा वेगवान पराक्रम : अवघ्या ३ तासांत हरवलेले वृद्ध शोधून कुटुंबीयांच्या ताब्यात
नालासोपारा – पोलिसांच्या तत्पर कार्यामुळे एका हरवलेल्या वृद्धाला सुखरूप शोधण्यात यश आलं आहे. गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी अरविंद जीना शिंगाडा हे नालासोपारा येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. रात्री जेवण करून विरारकडे जात असताना ते रस्ता चुकले व अचानक हरवले.
कुटुंबीयांनी रात्रीभर शोध घेतला, मात्र ते कुठेही सापडले नाहीत. अखेर त्यांनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच API जरिया बागवान, महिला पोलीस शिपाई मोनिका दामल, पोलीस शिपाई पवनसिंग ठाकूर आणि पोलिस ठाण्यातील अन्य कर्मचारी यांनी तातडीने शोधमोहीम राबवली.
हरवलेले अरविंद शिंगाडा फक्त गुजराती भाषेत बोलत असल्याने शोधमोहीम अधिक अवघड होती. त्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा पत्त्याची कोणतीही माहिती नव्हती. तरीदेखील पोलिसांनी काटेकोरपणे शोध घेऊन अवघ्या तीन तासांत त्यांना शोधून कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं. स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी नालासोपारा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.