शिंदे गट आणि ठाकरे गटात प्रभादेवी परिसरात जोरदार राडा; पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर कारवाई

Spread the love

शिंदे गट आणि ठाकरे गटात प्रभादेवी परिसरात जोरदार राडा; पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरुन या वादाची ठिणगी पडली. यामधून प्रभादेवी सर्कल येथे ठाकरे आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभादेवी सर्कल येथील सुशोभीकरणाच्या कामावरुन दोन्ही गटात वाद होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालिकेकडून येथील कामाच्या वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या. यावरुन आज सकाळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात राडा झाला. दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काही वर्षांपूर्वी प्रभादेवीत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. विद्यमान आमदार महेश सावंत आणि शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते त्यावेळी एकमेकांना भिडले होते. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता तेव्हा तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला होता. यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या कारणामुळे दादर-माहीम विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत असतो. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी राजकीय लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. याबाबत शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे, त्यामुळे आम्ही हे काम करत होतो. आम्हाला निधी देखील उपलब्ध झाला आहे या कामासाठी. या आधी देखील सदा सरवणकर यांनी या चौकासाठी निधी उपलब्ध केला होता आणि काम केलं होते. त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही. काम हे दहा दिवसांपासून सुरु आहे. पण आम्ही जिकडे काम केलं जिकडे आमचे नाव आहेत तिकडे काही लोक रंगरंगोटी करून त्यांची नावे लावत आहेत. एवढं होतं तर त्यांनी डीपीडीसीमधून निधी आणायला हवा होता. आज पण आम्ही माहीम मतदारसंघासाठी अनेक काम करतो. त्यांना एवढाच असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. फार मोजके लोक आहेत जे आमच्यामध्ये खोडा घालत आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टरला देखील धमकवण्यात आले होते. पण आम्ही नेहमी चांगली काम या मतदारसंघासाठी करत राहतो आणि करत राहणार, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon