मानखुर्दमध्ये इसमावर जीवघेणा हल्ला; पोलिसांची चार जणांवर कारवाई
रवि निषाद / मुंबई
मुंबई – मानखुर्द परिसरात एका इसमावर चार जणांनी चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी इसमाला पोलिसांनी तात्काळ राजावाडी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या डॉक्टर त्याच्यावर पुढील उपचार करत आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२५ भा.दं.सं. कलम १०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिमंडल ६ चे डॅशिंग पोलिस उपायुक्त समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अल्पावधीतच कारवाई करून चार संशयितांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी प्रौढ असून उर्वरित तीन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे मानखुर्द परिसरात खळबळ उडाली आहे. मानखुर्द पोलिसांचे पथक सध्या हल्ल्यामागील कारण आणि अन्य संबंधित बाबींचा तपास करत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.