नराधम पित्याकडून पोटच्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलीसांनी घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कमी होण्यास नाव घेत नाही. एकीकडे टोळी युद्धाने पुणे शहर हादरलं असताना पुण्यातील कोंढवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यात वडिलांनीच स्वत:च्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील कोंढव्यात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार महिने अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या काकडीवस्ती येथे एक नराधम बाप आपल्या १४ वर्षे अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून अत्याचार करत असल्याची माहिती गनिमीकावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होता. ही माहिती मिळाल्यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने या नराधमाला पकडले. त्यानंतर बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले.
स्थानिक नागरिकांनी या नराधम पित्याला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तिच्यासाठी समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे.