सहकारनगर पोलीसांची धडाकेबाज कारवाई; मोबाईल लुटणारे दोघे आरोपी गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत झालेल्या मोबाईल लुटीचा तपास करून पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत दोघा आरोपींना जेरबंद केले आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चंद्रकांत हे कामान रोड, कात्रज चौक, पुणे-सातारा रोड मार्गाने जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण करून मोबाईल फोन जबरीने लुटून पलायन केले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद (गु.र.नं. ३०४/२०२५, भा.दं.सं. ३९२, ३४) करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी अंकित गणेश शेलार (वय २०, रा. शाह अपार्टमेंट, साईबाबा मंदिर सेंटर, कात्रज) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन (किंमत ₹१५,४००/-) जप्त करण्यात आला. यानंतर त्याचा साथीदार सुशांत संजय शिंदे (वय २१, रा. यश एन्क्लेव्ह, कोंढवा) यालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बन्सोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ श्री. नितीन मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश चव्हाण तसेच पोलीस अंमलदार अमोल पवार, अमित पाटील, बबनराव पवार, निलेश शिरसाठ, महेश कोळते, दीपक तडवी, किरण कांबळे, अभिमान बागलकर, महेश माळग, गणेश पाटोळे आदींचा समावेश होता. सध्या पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.