टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा; उल्हासनगर महापालिका निवडणुकीत युतीची घोषणा
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय घडामोड घडली असून, टीम ओमी कलानीने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. शुक्रवार रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यातील दोस्तीचे गठबंधन जाहीर करण्यात आले. या निमित्ताने शिवसेनेचे संसदीय गटनेते व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगराला भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. शिंदे यांचे स्वागत केले. परस्पर सहकार्याचा आनंद व्यक्त करत डॉ. शिंदे यांनी ओमी कलानी व कार्यकर्त्यांना पेढे भरवून युतीला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ओमी कलानी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. शिवसेना समवेत एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे.” शिवसेना आणि टीम ओमी कलानी युतीमुळे उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवा कल मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते आता निवडणुकीत एकत्रितपणे झेपावणार असून, आगामी राजकीय लढाईत या युतीला किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.