दहावीतील विद्यार्थीनीच्या छातीवर चाकूने वार; नागपूरमध्ये शाळेच्या बाहेर थरार
योगेश पांडे / वार्ताहर

नागपुर – नागपूरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दहावीतील विद्यार्थीनीच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेत विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. या मुलीची हत्या करणारा आरोपी हा अल्पवयीन आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. नागपुरात दहावीतील विद्यार्थिनीची तिच्या शाळेसमोरच भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेबाहरे ही घटना घडली. आरोपीदेखील अल्पवयीनच असून हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
मृत विद्यार्थीनी शाळेमध्ये दहावीत शिकत होती. तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर ही विद्यार्थीनी मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच अल्पवयीन आरोपी तिची प्रतीक्षा करत होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली. दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला पकडले आणि खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले. त्याने खोलवर घाव केल्याने मुलगी जोरजोरात ओरडत खाली पडली. आरोपीने तिच्यावर वार सुरूच ठेवले. त्यानंतर दुचाकी तेथेच सोडून तो अजनी रेल्वे कॉलनीतील हॉकी मैदानाच्या दिशेने पळत जात फरार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली.