मालवणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : २०४.६० किलो गांजा, देसी पिस्तूल व काडतुसे जप्त; ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई – अंमली पदार्थ व बेकायदेशीर शस्त्रांच्या विरोधात मालवणी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत तब्बल २०४.६० किलो गांजा, एक देसी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एकूण ७२ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी उशिरा रात्री उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पोलिसांनी वासिफ हुसेन खान (वय ४८) याच्याकडून १ किलो ६०० ग्रॅम गांजा (किंमत सुमारे २६,५०० रुपये) जप्त केला. त्यानंतर पुढील तपास सुरू झाला. चौकशीत या अंमली पदार्थांच्या मागील रॅकेटचा धागा हाती लागल्याने पोलिसांनी संतोष मोरेला चांदवड टोल नाक्यावर अटक केली.
मोरेच्या चौकशीत धुळे-नाशिक परिसरातील चार इसमांकडून गांजा खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मालवणीतील मढ परिसरात सापळा रचला. दोन संशयित वाहनांची झडती घेतली असता २०३ किलो गांजा, एक देसी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत हा गांजा ओडिशातून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट १९८५, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईत शशीकुमार मिना (अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग), संदिप जाधव (डीसीपी परिमंडळ ११), निता पाडवी (सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग), शेलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिवन भातकुले (पो.नि. गुन्हे, मालवणी ठाणे), सपोनि सिध्दार्थ दुधमल, सपोनि हरिष शिळमकर, तपासी अधिकारी पो.उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे व निगराणी पथकातील सपोनि साळुंखे, पो.उपनि. मासाळ, पो.ह. अनिल पाटील, पो.ह. स्वप्नील काटे, पो.शि. साजिद शेख, पो.शि. मुददसिर देसाई, पो.शि. समित सोरटे, पो.शि. कालीदास खुडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मालवणी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा आघात झाला असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.