हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत संदेश देणारे “राम रहीम मित्र मंडळ”
सण-उत्सवांतून बंधुभावाचा दिला जातोय अनोखा वारसा
पालघर / नवीन पाटील
“धर्म वेगळा असला तरी उत्सव आणि आनंद यांचे स्वर एकच असतात” या विचाराचा जिवंत प्रत्यय पालघर जिल्हातील सफाळे पूर्वेकडील मीरा नगर येथील राम रहीम मित्र मंडळाने मागील १३ वर्षांत दिला आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, होळी, दिवाळी किंवा बकरी ईद असो, हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन सण साजरे करणे ही मंडळाची खासियत बनली आहे. त्यामुळे मंडळाचे नाव आज पंचक्रोशीत ऐक्य, सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाने दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीची स्थापना केली होती. यंदाचे 14 वे वर्ष असल्याने आणि नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्यासाठी लहान मुलांसाठी वेषभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. पारंपरिक व आधुनिक वेषभूषांमध्ये सजून मुलांनी रंगतदार सादरीकरणे केली. यामुळे मुलांना आपली कला व्यक्त करण्यासह सामाजिक-सांस्कृतिक जाणही वाढीस लागली.
मंडळाच्या कार्यामध्ये अध्यक्ष तानाजी चव्हाण, नागनाथ सर, बालकृष्ण पाटील, विकास भोईर, नोबेल कुमार पवार, विशाल करंडे, नीलेश घरत, चिन्मय साने, जल्लु भाई, आरिफ भाई, प्रकाश साने, अरमान शेख व दिपक पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे मंडळ सामाजिक एकात्मता जपत दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविते.
स्थानिक नागरिकांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना, “राम रहीम मित्र मंडळाने गावात सलोखा आणि बंधुभावाची परंपरा रुजवली आहे. समाजातील तरुणाईला खरी दिशा देणारे हे मंडळ आज आदर्श ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दीप सतत प्रज्वलित ठेवत, समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी योगदान देणारे हे मंडळ म्हणजेच खरी लोकसंपर्काची शिदोरी असल्याच्या भावना स्थानिकातून व्यक्त केल्या जात आहेत.