उल्हासनगरच्या बालसुधारगृहातून ६ मुलींचे पलायन
दोन मुली सापडल्या, चार मुलींचा पोलिसांचा शोध सुरू; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर येथील शासकीय बालसुधारगृहातून तब्बल सहा अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २७ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू करून त्यापैकी दोन मुलींना त्यांच्या मिरा-भाईंदर येथील घरी शोधून काढले आहे. मात्र अजून चार मुलींचा शोध सुरू असून या घटनेने बालसुधारगृहातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन ते तीनच्या सुमारास सहा मुलींनी बालसुधारगृहाच्या मेन गेटची चावी मिळवली. यावेळी गेटवर नेमलेले सुरक्षा रक्षक जेवणासाठी गेले होते. संधी साधून मुलींनी मेन गेट उघडले व पलायन केले. या मुली ठाणे, मिरा-भाईंदर व मुंबई परिसरातील असल्याचे समोर आले आहे.
सापडलेल्या दोन मुलींनी पोलिसांना जबाब देताना सांगितले की, “आम्हाला सुधारगृहात राहायचे नाही, म्हणून आम्ही पळून गेलो.” त्यानंतर पोलिसांनी उर्वरित मुलींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उल्हासनगरचे डीपीसी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली असून लवकरच उर्वरित चार मुलींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बालसुधारगृहातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी उघड झाल्या असून प्रशासनावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.