पत्नीनं जीवनयात्रा संपवल्याप्रकरणी पोलीस नाईकाविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथे राहणाऱ्या एका पोलीस नाईकाच्या पत्नीनं आत्महत्या केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती फरार झाला आहे. अमोल भाऊलाल राऊत (रा. मूळ नाशिक) असे या पोलीस नाईकाचे नाव असून तो राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता. त्याचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली असून, याच कारणावरून पत्नीला मानसिक छळ सहन करावा लागत होता.
नऊ वर्षांचे वैवाहिक आयुष्य, पण दोन वर्षांत सुरू झाले कलह
अमोल आणि सारिका अमोल राऊत यांचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर पहिली सात वर्षे त्यांचे संसार आयुष्य सुरळीत पार पडले. मात्र, गेल्या दोन वर्षांत अमोलचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. या संबंधांवरून दांपत्यामध्ये सतत वाद व्हायचे. अमोल पत्नीवर मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
भावाने केला होता जाब
सारिकाने हा छळ आपल्या कुटुंबियांना सांगितला होता. तिचा भाऊ समीर पांडुरंग सोनावणे याने अमोलला जाब विचारण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते.
घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली
आठ दिवसांपूर्वी अमोल कामानिमित्त पुण्याला गेला होता. त्याच वेळी सारिकाने गोरेगाव येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होताच पती फरार
सदर प्रकरणी वनराई पोलिसांनी अमोल राऊतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे पोलिस दलातील एका अधिकाऱ्याचे अनैतिक संबंध व कौटुंबिक वादामुळे झालेले परिणाम पुन्हा एकदा उघड झाले आहेत.