भावोजीवर मेहुण्याचा गोळीबार; उल्हासनगर हादरलं!
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने हादरलं आहे. सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवरच त्याच्या मेहुण्याने गोळीबार करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री घडली. या घटनेत भावोजी सोबत असलेला त्याचा मित्रदेखील गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील साईनाथ कॉलनी परिसरात रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रहिवासी योगेश मिश्रा (भावोजी) व त्याचा मित्र धीरज मिठाले सार्वजनिक शौचालयात गेले असता, तेथे अचानक योगेशचा मेहुणा मोनू शेख आपल्या साथीदारांसोबत आला. क्षणाचाही विलंब न लावता मोनूने योगेशवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात योगेशच्या छातीत गोळी घुसली. इतकेच नव्हे तर गोळीबारानंतरही आरोपींनी धारदार शस्त्र आणि तलवारींच्या सहाय्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात योगेश व धीरज गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुना वाद हल्ल्यामागे?
या घटनेमागे जुना वाद असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आरोपी मोनू शेख आणि जखमी योगेश मिश्रा हे काही काळ एकत्र काम करत होते, मात्र त्यांच्यात गंभीर वाद निर्माण झाले होते. त्याशिवाय, योगेशने मोनूच्या बहिणीशी विवाह केल्यामुळे मोनूच्या मनात प्रचंड राग होता. त्यातूनच या हल्ल्याचा थरारक प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी फरार; पोलिसांचा कसून शोध
गोळीबारानंतर आरोपी मोनू शेख व त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत. उल्हासनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या घटनेतील जखमी तसेच आरोपी अशा दोन्ही बाजूंच्या व्यक्तींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी सांगितले की, “मोनू शेखच्या अटकेनंतरच हल्ल्यामागचे खरे कारण स्पष्ट होईल. सध्या आमची पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत.” उल्हासनगरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.