नालासोपाऱ्यातून १५ वर्षीय युवती बेपत्ता; तुलींज पोलिसांकडून तपास सुरू
रवि निषाद / मुंबई
मीरा-भायंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तुलींज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून एका १५ वर्षीय युवतीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कु. सेजल बबलू यादव हिचा २६ ऑगस्टपासून मागोवा लागत नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या शोधासाठी चक्रे फिरवली आहेत.
सेजल यादव ही नालासोपारा (पूर्व) येथील ओसवाल नगरीतील साई दीप सोसायटी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. ती नवजीवन हायस्कूल जवळील परिसरातून राहते. २६ ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे ३.४५ वाजता ती घरातून बाहेर पडली; मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. बराच वेळ उलटूनही मुलीचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी चिंताग्रस्त होऊन तुलींज पोलिस ठाण्यात धाव घेतली.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६०४/२०२५ नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहिता (बीएनएस २०२३) अंतर्गत कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सध्या मुलीच्या शोधासाठी तुलींज पोलिसांचे पथक विविध ठिकाणी तपास करत असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणाला सेजल हिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर तातडीने तुलींज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.