पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय! क्यूआर कोड स्कॅन करून तिकिट मिळणार नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अनेकदा प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करताना ऑनलाईन तिकिट काढून प्रवास करत असतात. पण आता हे ऑनलाईन तिकिट चालणार नाहीये. पश्चिम रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूटीएस ॲपच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर असणारे क्यूआर कोड स्कॅन करून तिकिट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर केला जात होता. आता याच सुविधेला घेऊन पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापासून हे ऑनलाईन तिकिट वैध नसणार आहे. अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर असलेल्या क्यूआर कोड सेव्ह करत असतात. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील असलेल्या ह्या कोडची पीडीएफ फाईल बनवून प्रवाशांमध्ये ते शेअर करायचे. अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करायचे, रेल्वेमध्ये प्रवास करताना तिकीट काढत असल्यामुळे रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
वेगवेगळ्या स्टेशनवरील क्यूआर कोड प्रवाशांना अगदी सहजतेने उपलब्ध होत होते. त्यामुळे तिकीट तपासनीस (टीसी) लोकलमध्ये येताच अनेक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तो कोड स्कॅन करून तिकीट काढतात आणि कारवाई तसेच दंड भरण्यापासून वाचवतात. त्यामुळे ही सुविधा तत्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाला केली होती. त्यांची ही मागणी आता अखेर पूर्ण झाली आहे. ही सुविधा पश्चिम रेल्वेने त्यांच्या प्रमुख स्थानकांवर बंद केली आहे. एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने ऑनलाईन तिकिटाची सुविधा बंद केली आहे. अनेक प्रवासी या सुविधेचा गैरफायदा घेत होते. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. शिवाय अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, काही फुकटे प्रवासी प्रवासादरम्यान तिकिट काढत नव्हते. त्यांच्या येणाऱ्या सततच्या तक्रारींमुळे आम्ही यूटीएस ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर आता यूटीएस ॲप हा ३० रेल्वे स्थानकांवर बंद केला गेलेला आहे. त्या स्थानकांवरील असलेले १०० ते १२५ क्यूआर कोड बंद करण्यात आलेले आहेत. मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेमध्ये बचत व्हावी, यासाठी रेल्वेने यूटीएस ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली होती. २०१६ पासून यूटीएस ॲपची स्थापना करण्यात आली होती.