तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळला. या घटनेत एक चार वर्षीय निरागस बालक जागीच ठार झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमारे चाळीस वर्षे जुनी असलेली ही इमारत आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होती. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, इतकी जुनी व धोकादायक स्थितीत असलेली इमारत वेळीच का रिकामी करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याची कार्यवाही आधीच का केली नाही? जर असे केले असते, तर एका चार वर्षांच्या निष्पाप जीवाचा बळी गेला असता का? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
या घटनेने नयानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.