कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील कचराकुंडीत एक महिण्याची नवजात बालिका सापडल्याने खळबळ

Spread the love

कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील कचराकुंडीत एक महिण्याची नवजात बालिका सापडल्याने खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील कचराकुंडीलगत गोणीत गुंडाळून फेकलेली एक महिना वयाची नवजात बालिका सापडल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने शोध घेत स्थानिक नागरिकांनी या चिमुरडीची गोणीतून सुटका करत खडकपाडा पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी तातडीने धाव घेत या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्या अज्ञात आईचा शोध सुरु केला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास बारावे गावात असलेल्या कचरा कुंडीलगत छोट्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने नागरिक चक्रावले. कचरा कुंडीलगत फेकलेल्या एका गोणीतून आवाज येत असल्याचे पाहून नागरिकांनी तातडीने गोणी उघडून पहिले असता यात महिनाभर वयाची एक चिमुरडी रडत विव्हळत असल्याचं दिसून आले.

नागरिकांनी तातडीने या मुलीला उचलून घेत तिला चांगल्या कपड्यात गुंडाळत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या चिमुरडीला ताब्यात घेत तिला रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या चिमुरडीला कचऱ्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा पोलिसाकडून शोध सुरु असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon