मुंबई हादरली! वारंवार डोअर बेल वाजवणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार

Spread the love

मुंबई हादरली! वारंवार डोअर बेल वाजवणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – आजकाल घरातील राशनभरण्यापासून ते खाद्य पदार्थ ऑर्डर करण्यापर्यंत अनेकजण ऑनलाईन एपचा वापर करतात. काही मिनिटांच्या आत डिलिव्हरी बॉय ते आपल्याला घरपोच देतात. पण मुंबईच्या परळ भागात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका डिलिव्हरी बॉयवर ग्राहकाने थेट गोळी झाडली आहे. या घटनेने संपूर्ण परळ हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही घटना मुबंईतील परळ येथीस नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन इमारतीत घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयने वारंवार डोरबेल वाजवल्याने संतापून हवेत गोळी झाडली. या संपूर्ण घटनेत डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश कॉटन इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सौरभ कुमार याने शुक्रवारी संध्याकाळी एका ऑनलाइन मेडिकल एपद्वारे औषधे मागवली होती. डिलिव्हरी बॉय औषधे घेऊन त्यांच्या फ्लॅटच्या दारापर्यंत पोहोचला. त्याने बेल वाजवली, पण सौरभने दार उघडले नाही.

यानंतर डिलिव्हरी बॉयने दोन-तीन वेळा बेल वाजवली. यामुळे सौरभ भडकला. रागाच्या भरात त्याने दार उघडले आणि डिलिव्हरी बॉयला पाहताच आपल्या एअर रायफलमधून हवेत गोळी झाडली. नशीबाने गोळी हवेतच गेली आणि कोणालाही दुखापत झाली नाही. डिलिव्हरी बॉयने तात्काळ आपला जीव वाचवला आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सौरभला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. सौरभने पोलिसांना सांगितले की, डिलिव्हरी बॉयने वारंवार बेल वाजवल्याने त्याला राग आला, त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. डिलिव्हरी करणारा व्यक्तीही खूप घाबरला. त्याने सांगितले की, त्याने फक्त आपले काम केले आणि तो कोणत्याही अडचणीत पडू इच्छित नव्हता. तरीही, गोळी झाडल्याने त्याला खूप भीती वाटली. एन एम जोशी मार्ग पोलिसांनी प्रकरण नोंदवले असून तपास सुरू आहे. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, सौरभ सहसा लवकर रागावतो, पण अशी घटना त्यांच्या परिसरात पहिल्यांदाच घडली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon