दादरमध्ये अभिनेत्याची फिल्मी स्टाईलने फसवणूक; १७ लाखांची रोकड घेऊन आरोपींचा पोबारा

Spread the love

दादरमध्ये अभिनेत्याची फिल्मी स्टाईलने फसवणूक; १७ लाखांची रोकड घेऊन आरोपींचा पोबारा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – चित्रपट व मालिका सृष्टीत कार्यरत असलेल्या एका अभिनेत्याची थरारक पद्धतीने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दादरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलजवळ, नोटाबदलाच्या बहाण्याने १७ लाख रुपयांची रोकड घेऊन आरोपींनी पोबारा केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अभिनेता अभय झा यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अधिकृत माहितीनुसार, अभिनेता अभय झा यांची ओळख काही महिन्यांपूर्वी रोशनकुमार नावाच्या व्यक्तीशी झाली होती. अभिनय क्षेत्रातील ओळखीचा फायदा घेत रोशनकुमारने आपण चित्रपट प्रकल्पांसाठी आर्थिक निधी मिळवून देतो, असे सांगत अभय याचा विश्वास संपादन केला. अभयला स्वतःचा चित्रपट तयार करायची इच्छा असल्याने त्याने रोशनकुमारकडे मदतीची मागणी केली. यावर रोशनकुमारने महेंद्रसिंग नावाच्या व्यक्तीकडून पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर काही दिवसांनी, महेंद्रसिंग याच्या बहिणीचे लग्न असल्याचे सांगत रोशनकुमारने अभय याच्याकडे १०० रुपयांच्या नोटा खूप असल्याने त्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटांची गरज असल्याचे सांगितले. निधी मिळवून देणार असल्याच्या आश्वासनामुळे अभय याने विश्वास ठेवून आपले तसेच मित्र व नातेवाईकांकडून १७ लाख रुपये जमवून दिले.

घटनेच्या दिवशी, म्हणजे ४ ऑगस्ट रोजी, अभय झा यांना स्वामीनारायण मंदिर, दादरजवळ बोलावण्यात आले. तेथे आयुष नावाचा व्यक्ती त्यांना भेटला आणि वडाळा येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे रमेश नावाचा आणखी एक व्यक्ती त्यांना भेटला. महेंद्रसिंग याने फोनवरून १७ लाखांची रोकड रमेशकडे देण्यास सांगितले. ही बॅग घेऊन रमेश आणि आयुष दोघेही बाहेर पडले, मात्र परतलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहूनही कुणीच न आल्याने अभय यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी त्यांनी तत्काळ माटुंगा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोशनकुमार, महेंद्रसिंग, रमेश आणि आयुष या चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, त्यांच्या मोबाईल लोकेशन्सद्वारे तपास सुरू आहे.

या घटनेमुळे मनोरंजन विश्वात नवोदित कलाकारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशा आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन विविध कलाकार संघटनांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon