वेश्याव्यवसायावर पोलिसांचा धडक छापा; ‘स्पा’च्या आड चालत होता अनैतिक व्यवहार, १० मुलींची सुटका
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील ‘अवंतरा स्पा’मध्ये स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी धडक कारवाई करत तेथे छापा टाकला. या कारवाईत १० महिलांची सुटका करण्यात आली असून, चालक, मालक आणि व्यवस्थापक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कल्याण पश्चिमेतील ‘अवंतरा स्पा’ या ठिकाणी स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू आहे. माहितीच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. छाप्यादरम्यान, स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून १० महिलांची सुटका केली असून, नौशाद शेख (चालक), योगेश चव्हाण (मालक), आणि भीमसिंग नाईक (मॅनेजर) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की, अशा प्रकारे स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सुटलेल्या महिलांना पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिकांमध्ये संताप
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी अशा स्पा सेंटर्सवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.