परिमंडळ ४ची विशेष मोहीम : ५६७ मोबाईलसह ४.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त; तक्रारदारांना दिलासा

Spread the love

परिमंडळ ४ची विशेष मोहीम : ५६७ मोबाईलसह ४.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त; तक्रारदारांना दिलासा

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत देण्यासाठी परिमंडळ ४ अंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत एकूण ५६७ मोबाईल फोन तसेच घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील मौल्यवान दागिने व वस्तू असा सुमारे ४ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो तक्रारदारांना परत सुपूर्द करण्यात आला.

परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये २० जानेवारी २०२६ पासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. २०१९ ते २०२६ या कालावधीत चोरीस गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलची यादी तयार करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आला. त्यानुसार मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पोलीस पथके पाठवून शोधमोहीम राबविण्यात आली.

या कालावधीत एकूण ५६७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक आहे. याशिवाय घरफोडी व चोरीच्या २४ गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ३ कोटी ४ लाख रुपये आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आला.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेचे आयोजन परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांनी केले. भोईवाडा, काळाचौकी, माटुंगा, आर. ए. किडवाई मार्ग, सायन, अँटॉप हिल आणि वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
या यशस्वी मोहिमेमुळे अनेक तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon