नागपुरात बनावट नोटांचं रॅकेट उघड? ५०० च्या नोटांसह पश्चिम बंगालचे दोघे अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर– ५०० रुपयांच्या नोटांबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. नोटा बंद होणार अशीही चर्चा असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. उपराजधानी नागपूर शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्न करत होते. पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतलं. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपयांच्या २४३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनरून हुसेन लोकमान शेख हुसेन आणि अजीम टानू शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गार्ड लाईन परिसरातून या दोघांनाही अटक करण्यात आली.पोलिसांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, मेयो हॉस्पिटलच्या गार्ड लाईन परिसरात सापळा रचून पोलिसांनी या दोघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी एकूण ५०० रुपयांच्या २४३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत, ज्यांचे एकूण मूल्य १ लाख २१ हजार रुपये आहे. आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांनी आणखी बनावट नोटा चलनात आणल्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती दिली. या खोट्या नोटांमध्ये एक लहानशी पण महत्वाची चूक आढळून आली आहे. “रिझर्व बँक ऑफ इंडिया” या शब्दात, “रिझर्व” या शब्दामधील ‘ई’ अक्षराऐवजी चुकून ‘ए’ लिहिण्यात आले आहे. म्हणजेच त्या ठिकाणी “RASERVE” असं चुकीचं स्पेलिंग छापलं आहे. ही चूक बारीक लक्ष दिल्यास लक्षात येऊ शकते. या नोटा अगदी कागदासारख्या असतात. त्याच्यावरची हिरवी-निळी रेष चकाणारी असते, खोट्या नोटांवर ती रेश चकाकत नाही.