घोडबंदर रोड ४ दिवसांसाठी एका बाजूने बंद; दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे आणि मीरा-भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला घोडबंदर रोड पुढील ४ दिवसांसाठी दुरुस्तीच्या कामामुळे एका बाजूने बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. येत्या ८, ९, १० आणि ११ ऑगस्ट रोजी हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद राहील. तसेच आणखी एका दिवसासाठी हे काम सुरू राहणार आहे. या काळात नीरा केंद्र ते फाऊंटन या परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असणार आहे. हे काम मीरा-भाईंदर महानगरपालिका करत आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली ठेवली जाईल, तर दुसऱ्या मार्गिकेवर काम केले जाईल. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासाचा २० ते ४० मिनिटे वाढण्याची शक्यता आहे. वाहतुकीचे नियोजन मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आणि ठाणे वाहतूक पोलीस संयुक्तपणे करणार आहेत. या काळात अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. पवईच्या दिशेने ही वाहतूक वळवण्यात आली आहे. या ४ दिवसांच्या कालावधीत, प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक रुग्णवाहिका आणि क्रेन दोन्ही बाजूंनी तैनात केली जाईल, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळू शकेल. नागरिकांनी या काळात सहकार्य करण्याचे आणि चुकीच्या दिशेने वाहन न चालवण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.