१५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. या महापालिकेच्या कामाची चर्चा तर नेहमीच होत असते. भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. विरोधकांनी तर कल्याण डोंबिवली महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचाही आरोप केला होता. त्यात आता कल्याण डोंबिवली महापालिकेने एक निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. असा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. १४ ऑगस्टला रात्री १२ पासून १५ ऑगस्ट रात्री १२ पर्यंत प्राण्यांची कत्तल करु नये असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मास विक्रीही या दिवशी करू नये असं महापालिकेनं सांगितलं आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हा इशारा महापालिकेच्या परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिला आहे. या कालावधीमध्ये जनावरांची कत्तल अथवा मांसविक्री केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा नुसार कारवाई करण्यात येईल असे महापालिकेने सूचित केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शेळया मेंढया कोंबडयाची तसेच मोठ्या जनावरांची कत्तल, मांसाची विक्री करणाऱ्या खाटीक आणि कसाई असलेल्या अधिकृत परवानाधारकांना याबाबत कळविण्यात आले आहे.