ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ३.३९ कोटींचा चरस जप्त; आंतरराज्यीय तस्कर अटकेत
ठाणे : ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत ३.३९ कोटी रुपयांचा चरस जप्त केला असून, उत्तर प्रदेशातून आलेल्या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार आणि विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. ही कारवाई ३१ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता उथळसर नाका परिसरातील सुप्रभ सोसायटीजवळील रसोई पोळी भाजी केंद्राजवळ सापळा रचून करण्यात आली. मोहमद मकसुद मोहमद अहमद (वय ४२),रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश, व्यवसाय – ड्रायव्हर असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ३ किलो ३९० ग्रॅम चरस (किंमत ₹३,३९,००,०००/-), रोख रक्कम ₹१,७७०/- ओळखपत्रे (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) एक पाकीट व मोठी प्लॅस्टिक पिशवी असा एकूण ₹३,३९,०७,२७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने केली तर निलेश मोरे, सोमनाथ पाटील, राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपक डुम्मलवाड, हरीष तावडे, अभिजीत मोरे, हेमंत महाले, अमोल देसाई, शिवाजी रावते, शिवाजी वासरवाड, शिल्पा कसबे, कोमल लादे यांचा समावेश होता. ठाणे पोलीसांच्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधात ठोस पाऊल उचलले गेले आहे.