मोटारकार डिपॉझिटवरून हत्याकांड : अपहरण व हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत; मयताचा मित्र शीळ-डायघर पोलिसांकडून सुखरूप मुक्त

Spread the love

मोटारकार डिपॉझिटवरून हत्याकांड : अपहरण व हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत; मयताचा मित्र शीळ-डायघर पोलिसांकडून सुखरूप मुक्त

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मोटारकारच्या डिपॉझिट रकमेवरून निर्माण झालेल्या वादातून शिळ-फाटा येथे एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. याच प्रकरणात मृत युवकासोबत असलेल्या मित्राचे जिवेठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटण्यात आली होती. शिळ-डायघर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना अटक करून अपहृत युवकाची सुखरूप सुटका केली आहे.

२९ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रिगल हॉटेल परिसरात ही घटना घडली. तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख याने चारचाकी वॅगनआर (एमएच ०२ जीएच ९३६७) ही सैफअली खान याच्याकडून डिपॉझिट व प्रतिदिन भाड्याने घेतली होती. वाहन परत दिल्यानंतरही डिपॉझिटची रक्कम न मिळाल्याने वाद झाला. रक्कम देण्याच्या बहाण्याने सैफअली खानने तक्रारदारास बोलावले.

तक्रारदार आपल्या मित्रांसह तेथे पोहोचताच सैफअली खान, शोएब खान व आरिफ खान यांच्यात शाब्दिक वाद होऊन धक्काबुक्की झाली. आरिफ खानने अमन शेख याचे हात पकडले असताना सैफअली व शोएब यांनी धारदार चाकूने छातीवर वार करून अमन शेख याची हत्या केली. मदतीला धावलेल्या अबुतालीब यालाही चाकूने दुखापत करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराचे जबरदस्तीने अपहरण करून ‘आता याचाही काम तमाम करू’ अशी धमकी देत मारहाण करत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गंभीर कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करून गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे देसाई गावातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अपहृत तक्रारदाराची सुखरूप सुटका करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली कार व हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon