बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अहिल्यानगर पोलिसांकडून तब्बल ६० लाखांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त, सात जणांना बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या तालुका पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी ६० लाख ५० हजार रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तर २ कोटी १६ लाख रुपये किमंतचे बनावट नोटा बनवण्याचे कोरे कागद जप्त करण्यात आले आहे. अहिल्यानगरच्या आंबीलवाडी येथील एका पान टपरीवर लागलेल्या सुगाव्यानंतर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीतील सात जणांना अहिल्यानगर, बीड आणि संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं आहे. निखिल गांगर्डे, सोमनाथ शिंदे , प्रदीप कापरे, मंगेश शिरसाट , विनोद अरबट, आकाश बनसोडे , अनिल पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंबादास ससाने हा फरार आहे. अहिल्यानगरच्या तालुका पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा पाचशे रुपयांच्या असून त्या खऱ्या नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या आहेत.
या नोटा संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये येथे तयार केल्या जात होत्या आणि त्या वेगवेगळ्या जिल्ह्यात चलनात आणल्या जात होत्या. आंबीलवाडी येथील एका पान टपरी चालकाला या नोटाचा संशय आल्याने त्याने नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. नगर तालुका पोलिसांनी तात्काळ या माहितीची दखल घेत दोन जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना बीड आणि संभाजीनगर असं कनेक्शन समोर आलं. संभाजीनगरच्या वाळुज एमआयडीसी परिसरात या नोटा बनवण्याचा कारखानाच असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी कारखान्यातील बनावट नोटा बनवण्याचे साहित्य देखील जप्त केलं आणि या नोटा बनवणारे आणि त्या चलनात आणणाऱ्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सातही जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.५० हजार रुपयांना एक लाख रुपयांच्या बनावट नोटा या रॅकेटमधल्या वितरकांना मिळत होत्या. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांना मोठा नफा मिळत असल्याने ते देखील सर्रासपणे या नोटा छोट्यामोठ्या व्यावसायिकांना देत होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या बनावट नोटा गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात आहेत. या बनावट नोटांची व्याप्ती किती मोठी आहे हे स्पष्ट नसलं तरी छोट्या-मोठ्या व्यवसायिकांपासून बँकांपर्यंत या नोटा पोहोचतात. त्यामुळे अशा बनावट नोटांबाबत बँकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.