अखेर मुंबईचा महापौर भाजपचाच!
मुंबई महापालिकेत महापौर
भाजपचा तर उपमहापौर शिवसेनेचा होणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेचा ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद भाजप कडे, स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता आहे. यामुळं मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिकेतील सत्ता समीकरणांसदर्भात गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती, त्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुतीत येणाऱ्या काळात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळेल, मात्र आता ही दोन्ही पदं भाजपकडे राहणार असल्याची शक्यता आहे. प्रभाग समिती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर इथे शिवसेनेचा महापौर आणि भाजपच्या उपमहापौर असेल. तर, मुंबईत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचे यापूर्वी प्रभाकर पै महापौर बनले होते. ते १९८२ मध्ये मुंबईचे महापौर होते. आता पुन्हा एकदा मंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार आहे. तब्बल २५ वर्षानंतर ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्ता जाऊन महापौरपदी भाजपकडे येणार आहे. यापूर्वी अनेक वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती.