पाच दिवसांच्या बाळाला निर्जन स्थळी मृत्यूच्या तोंडात ढकलणाऱ्या माता-पित्याला अखेर बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पाच दिवसांच्या तान्हुल्याला उड्डाणपुलाखाली निर्जन स्थळी मृत्यूच्या तोंडात ढकलून चक्क माता-पिताच पसार झाल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यातील सांगवी पोलिसांनी उत्तम कामगिरी करून फरारी आरोपी शोधले आणि हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आणला. आरोपी प्रतीक तुपे – २४ आणि समीधा तुपे – २७ यांनी तिसऱ्या बाळास रुग्णालयात जन्म दिला. मात्र, बाळ माझे नाही, असा संशय आरोपी पित्याने व्यक्त केला. दोन्ही पती-पत्नी आरोपींनी मिळून १८ जुलै रोजी या नवजात बालकास कासारवाडी येथील उड्डाणपुलाखाली सोडून पळ काढला होता. आरोपी माता समीधा हिला पहिल्या पतीपासूनही एक अपत्य असून, पहिल्या पतीला सोडल्यानंतर आरोपी प्रतीकपासूनही दुसरे अपत्य आहे. त्यानंतर पुन्हा झालेले अपत्य स्वतःचे नसल्याच्या संशयावरुन आरोपी प्रतीकच्या दबावातून या नवजात बालकास उघड्यावर बेवारस सोडून देण्याचा अपराध दोन्ही आरोपींनी केला आहे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरु सोसायटीशेजारी नाशिक फाटा-कासारवाडी उड्डाणपुलाखाली पाच दिवसांचे नवजात अर्भक सापडले आणि सांगवी पोलिसांची आई-वडील शोधण्याची मोहीम सुरू झाली.पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. प्राथमिक तपासात एक पुरुष व महिला लहान बाळाला दुचाकीवर येऊन येथे सोडून गेल्याचे दिसले. मात्र, सीसीटीव्हीत गाडीचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. परिसरातील अनेक सीसीटीव्ही सुरू नसल्यानेही अडचण वाढली. सांगवीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते, महादेव भालेराव, यांच्यासह पोलिस शिपाई विजय पाटील, राहुल मोघे, सचिन तुपे, सुनीता रावत यांच्या पथकाने धागेदोरे पकडून अखेर दोन्ही आरोपींना कामशेत येथील राहत्या घरातून शिताफीने पकडले.